काळम्मावाडी धरणाजवळ वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढताना पाय घसरून इचलकरंजीचा तरुण वाहून गेला. उज्जवल कमलेश गिरी (वय २१ रा.कोरोची माळ, ता.हातकणंगले, मूळ बिहार) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
काळम्मावाडी धरणाजवळ वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारे पाणी कालव्याद्वारे नदीत सोडले जाते. काही अंतर पुढे गेल्यानंतर कोसळणारे पाण्याचे छोट्याशा नयनरम्य धबधब्यात रूपांतर होते. आणि हेच कोसळणारे पाणी पाहण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी गर्दी करतात. आज सकाळी उज्जवल गिरी हा मित्रांसोबत फिरायला आला होता. दरम्यान सेल्फी काढताना तो पाय घसरून पाण्यात पडला. तो अद्याप मिळाला नाही. घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिस रेस्क्यु टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेस्क्यु टीमसह सदर व्यक्तीचा शोध घेत आहेत.
मे महिना सुट्टीचे दिवस चालू असल्याने अनेक पर्यटक राधानगरी, कळम्मावाडी येथे येत असतात. पण काही अती उत्साही तरुण जोशामध्ये पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे, सेल्फी काढणे या सारखे प्रकार करीत असतात. अशा उत्साही पर्यटकांच्या बेफिकिरीमुळे दुर्घटना घडतात. यापूर्वी तोरस्करवाडी येथे गारगोटीचा प्रणव कलगुटकी हा १९ वर्षाचा तरुण डोहात बुडाला होता.