“भुजबळांचे जेव्हा जेव्हा वाईट होतं, तेव्हा मला आनंद होतो”

नागपूर – महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान न दिल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले आहे. त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली आहे. पण आता एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने छगन भुजबळ यांना डिवचले आहे. त्यामुळे सरकारमधील विसंवाद समोर आला आहे.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना “भुजबळांचे जेव्हा वाईट होते तेव्हा मी नेहमीच खुश असतो”, असे म्हणत भुजबळ यांना डिवचले आहे. पुढे ते म्हणाले की, मी अजितदादांचे अभिनंदन करायला गेलो होतो. तसेच भुजबळांनी केलेल्या वाईट कृत्याचे जेव्हा त्यांना फळ मिळते, तेव्हा मला आनंद होतो. असे सुहास कांदे यांनी म्हटले आहे. तसेच  छगन भुजबळ बाहेर पडणार का? या प्रश्नावर सुहास कांदे म्हणाले की, “त्यांच्यात हिम्मत नाही. भुजबळांना चॅलेंज करतो, ते वेगळे होऊच शकत नाही. कुठे जायची, त्यांच्यात हिम्मत नाही” असे म्हणत कांदे यांनी भुजबळ यांच्यावर तोफ डागली आहे. सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्व महाराष्ट्राला माहित आहे. आता कांदे यांच्या नव्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. भुजबळांच्या संतापाने आणि कांदे यांच्या प्रतिक्रियांनी या संघर्षाचे राजकीय परिणाम लवकरच दिसून येतील, असे मानले जात आहे. त्यामुळे भुजबळ काय प्रतिक्रिया देणार हे पहावे लागेल.

२००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला. तर यावेळीही कांदे यांनी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा पराभव केला.