हलाल मटण आणि झटका मटण, दोन्हीत फरक काय?

मल्हार सर्टिफिकेटमुळे राज्यात हलाल विरुद्ध झटका वाद पेटणार, नेमका फरक काय असतो?

मुंबई – भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे झटका आणि हलाल मटन प्रकार चर्चेत आले आहेत. यातील फरक काय याची चर्चा सुरु झाली आहे. आज यातील प्रकार जाणून घेऊया.

सध्या बाजारात दोन प्रकारचे मटण-चिकन मिळतात. एक झटका प्रकार असतो तर एक हलाल प्रकार असतो.

हलाल मास

हलाल पद्धतीने जनावरांची कत्तल करणे म्हणजे जनावराच्या मानेवरील रक्तवाहिनीवर एक कट मारला जातो. त्यामुळं प्राण्याच्या शरीरातील सर्व रक्त बाहेर येते. पण या प्रक्रियेत प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. या प्रक्रियेत जनावराचं रक्त पूर्ण बाहेर पडल्यानंतर त्याच्या शरीराचे वेगवेगळे भाग केले जातात. जनावराची कत्तल करताना विशिष्ट प्रार्थना केली जाते. हलाल पद्धतीने प्राणी कापण्यासाठी जमीयत उल उलेमा ए हिंद यांच्या देखरेखीखाली प्रमाणपत्र दिलं जाते. इस्लाम धर्मात हलाल मास खाल्ले जाते. ज्यू धर्मीय देखील याच प्रकारचे मास खातात.

झटका मास

एका झटक्यात प्राण्याची मान त्याच्या धडावेगळी करण्याची पद्धत म्हणजे झटका मटण पद्धत. या पद्धतीत प्राण्याला बेशुद्धही केलं जाते. या पद्धतीने तयार केलेलं मटण म्हणजे झटका मटण. शीख समुदाय आणि हिंदू समुदाय प्राणी कापण्यासाठी ही पद्धत वापरतात.

राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी हिंदू मल्हार सर्टिफिकेट असणाऱ्या मटणाच्या दुकानातून मटण खरेदी करा असा फतवा काढला आहे. यामुळे आता राज्यात नव्याने हलाल विरूद्ध झटका असा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.