मुंबईत मध्यरात्री घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ माजली आहे. २३ जुलैच्या रात्री १२.३० च्या सुमारास मुंबईच्या वरळी नाका परिसरात स्पा सेंटरच्या क्लबमध्ये ५० वर्षीय व्यक्ती त्याचे मित्र आणि २१ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत बर्थ डे पार्टीसाठी गेला होता. मध्यरात्री पार्टी सुरू होती. दारु प्यायली होती.
पार्टी संपवून ते लोक मसाज पार्लरला येतात. काही वेळाने सगळे लोक पार्लर बाहेर पडतात परतु तो व्यक्ती आणि त्याची गर्लफ्रेंड आतमध्येच थांबतात. काही मिनिटांनी २ अज्ञात व्यक्ती मसाज पार्लरमध्ये जाताना दिसतात. त्यानंतर अचानक मोठा आवाज ऐकू येतो आणि हे दोघं बाहेर पडतात. बाहेरचे लोक आतमध्ये जाऊन पाहतात तर ज्या व्यक्तीने थोड्या वेळापूर्वी बर्थ डे पार्टी केली होती तो रक्ताच्या थारोळ्यात दिसून येतो.
या घटनेची माहिती पोलिसांना कळते, त्यानंतर पोलीस घटनास्थळी येतात. यात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव गुरुसिद्धप्पा वाघमारे उर्फ चुलबुल पांडे होतं. अखेरच चुलबुल पांडेची हत्या कुणी केली असा सवाल पोलिसांना पडतो. ते अज्ञात २ जण कोण होते, ज्यांनी चुलबुलचा मर्डर करून गायब झाले या सर्वांची उत्तरे पोलीस शोधत होती. तपासात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीत या व्यक्तीच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली.
ज्या चुलबुल पांडेची हत्या झाली तो एक हिस्ट्रीशीटर होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्यावर बलात्कार, धमकी देणे आणि हत्येचा प्रयत्न यासारखे १० गंभीर गुन्हे दाखल होते. चुलबुल हा स्वत:ला पोलिसांचा खबरी आणि आरटीआय कार्यकर्ता असल्याचं सांगायचा. १७ जुलैला त्याचा बर्थ डे होता. मंगळवारी रात्री तो सॉफ्ट टच स्पाला पोहचला. त्याठिकाणी काम करणाऱ्यांनी त्याच्याकडे बर्थ डे पार्टी मागितली. मध्यरात्री २.३० च्या सुमारास चुलबुलची हत्या झाल्याचं बोललं जातंय.
गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा आरोपी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा इथला आहे. सुरुवातीच्या तपासात सुपारी घेऊन चुलबुलची हत्या केल्याचं समोर आलं आहे. सध्या सक्षम पुरावे आणि तपास करणं बाकी आहे. पोलीस या प्रकरणी गर्लफ्रेंड, स्पा सेंटरच्या ३ लोकांची चौकशी करत आहेत ज्यांच्यासोबत त्याने अखेरची बर्थ डे पार्टी केली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ६ पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. सर्व अँगलने या घटनेची चौकशी केली जात आहे.