सावधान! महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी, पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचे दक्षतेचे आवाहन

पुणे – ज्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अवकाळी पाऊस उद्यापर्यंत म्हणजेच ४ एप्रिलपर्यंत राहणार आहे. आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या हिमालयीन भागात हवेच्या वरच्या स्तरावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, पश्चिम बंगालपासून मध्य प्रदेशापर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. दक्षिण-पूर्व मध्य प्रदेशातही द्रोणीय स्थिती आढळून येत आहे. याशिवाय, लक्षद्वीप ते कोकणपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या सर्व घटकांमुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत राहू शकतो. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग अधिक राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोकणासह राज्याच्या सर्वच भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट यासह काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हा पाऊस ४ एप्रिलपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं पुणेकरांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या गडगडाटादरम्यान उघड्यावर जाण्याचे टाळावे. शक्य असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. शेती कामे करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.

अवकाळी पावसाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी, द्राक्ष, कांदा, पपई, गहू, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आंबा, काजू आणि कोकम पिकांवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.