अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड

साताऱ्यात पार पडणार ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन, एकमताने झाली निवड, विश्वास पाटील कोण आहेत?

पुणे – सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथील शाहू स्टेडियम येथे हे संमेलन होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पुणे, मराठवाड्यासह काही साहित्य संस्थांकडून विश्वास पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तर मुंबई साहित्य संघाकडून पुन्हा एकदा प्रविण दवणे यांचे नाव पुढे करण्यात येईल अशी शक्यता होती, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे विश्वास पाटील यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात अर्थात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य महामंडळाची ही बैठक पार पडली. या बैठकीला महामंडळाच्या चारही घटक संस्थांचे तसेच संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विश्वास पाटील यांची एकमताने निवड झाल्याने बैठकीत मतदान घेण्याची वेळ आली नाही, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक शहर साताऱ्यात होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले भूषवणार आहेत. साहित्य आणि राजकारण यांच्या या अनोख्या संगमामुळे हे संमेलन विशेष लक्षवेधी ठरणार आहे. दरम्यान ‘पानिपत’कार म्हणून प्रसिद्ध असलेले विश्वास पाटील शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या संमेलनाचे नेतृत्व करणार आहेत.

विश्वास पाटील हे मराठीतील नामवंत आणि लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर प्रभावी लेखन केलं आहे. ‘पानिपत’, ‘झाडाझडती’, ‘सिंहासन’, ‘चंद्रमुखी’ अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या आहेत.