विसार पावती एकाबरोबर, जमीन विकली दुसर्‍याला ! २० लाखांची फसवणूक करणार्‍या कुटुंबावर गुन्हा दाखल

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – सासवड येथील जमीन विकत देण्याचा ठरवून २० लाख रुपये घेऊन विसार पावती केली. प्रत्यक्षात जमिनीची दुसर्‍यांना विक्री करुन फसवणुक करणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विशाल विनोदराव कुकडे यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिता प्रकाश बोरकर, इंद्रजित बोरकरआणि सायली फरगडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजित त्यांची आई अनिता बोरकर व बहिण सायली फरगडे यांनी सासवड येथील त्यांच्या वाटणीत आलेली ८ एकर २६ गुंठे जमिनीची ५ कोटी २५ लाख रुपयांना फिर्यादी यांना विक्री करण्याचे ठरवले.

त्यानुसार फिर्यादी यांच्याकडून २० लाख रुपये घेऊन सप्टेंबर २०२२ मध्ये विसार पावती केली. त्यानंतर त्यांना काही न कळविता़ ही मिळकत रमेश लक्ष्मण बोरावके, सचिन दामोदर भोंडे, अनिल पंढरीनाथ जगताप, दत्तात्रय किसन कामठे, अनिल दिनकर शेडगे यांच्याबरोबर सासवड येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर साठे खत करुन विक्री केली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांची २० लाख रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.