
वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, विज्ञानाबरोबरच साहित्यतही वावर, निधनांनतर विज्ञान साहित्य क्षेत्रात पोकळी

पुणे – खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय विज्ञानजगतात शोककळा पसरली आहे.

नारळीकरांचा जन्म २९ जुलै १९३८ रोजी कोल्हापुरात झाला होता. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसी इथल्या हिंदू विद्यापिठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. नारळीकरांचं शालेय शिक्षण वाराणसीमध्येच झालं. १९५७ मध्ये त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त केली होती. या परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले. डॉ. जयंत नारळीकर हे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रात महत्त्वाचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ होते. त्यांनी ब्रिटनमधील प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात सर फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले. ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ ही त्यांची एक जागतिक पातळीवर गाजलेली संकल्पना आहे, जी ब्रह्मांडाच्या स्थिर स्थितीचा विचार मांडते. डॉ. नारळीकर हे केवळ वैज्ञानिकच नव्हते, तर विज्ञान साहित्याचे लेखक, व्याख्याते आणि मार्गदर्शक म्हणूनही ते ओळखले जात. त्यांनी मराठी व इंग्रजीमध्ये अनेक विज्ञानपर लेख, कादंबऱ्या व कथालेखन केले. त्यांनी नाशिक येथे झालेल्या ९४ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते. ‘यक्षाची देवगिरी’, ‘छायामानव’, ‘तुम्ही ज्योतीर्विद का व्हावे?’ ही त्यांची काही लोकप्रिय पुस्तके आहेत. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) या गौरवांनी सन्मानित केले. महाराष्ट्र सरकारने डॉ. नारळीकरांना २०१० साली ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी अविरत कार्य केले. त्यांच्या निधनाने एक मात्तबर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. नारळीकर यांचे जाणे हे केवळ वैज्ञानिक क्षेत्रासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी मोठं नुकसान आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. विज्ञान, साहित्य, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.









