वसंत मोरेंनी स्वारगेटमधील सुरक्षा रक्षकाची केबिन फोडली

स्वारगेटमधील त्या बसमध्ये दारुच्या बाटल्या, साड्या आणि कंडोमचा खच, मोरेंचा सरकारला ‘हा’ इशारा

पुणे – पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकील आली आहे. या घटनेमुळं पुण्यात प्रकरण चांगलंच तापले आहे. ठाकरे सेनेचे वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकात खळखट्याक आंदोलन केले आहे.

स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही एसटीमध्ये आज तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वारगेटमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन केले आहे. त्यांनी स्वारगेटमधील सुरक्षारक्षाकांच्या कॅबिनची तोडफोड केली आहे. स्वारगेट स्थानकाच्या परिसरामध्येअनेक गंभीर प्रकारच्या घटना घडत असल्याचा त्यांनी दावा देखील केला. तसेच सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. वसंत मोरे यांनी बुधवारी दुपारच्या वेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह एसटी स्थानक गाठलं. यावेळी स्वारगेट स्थानकात ठाकरेंच्या सेनेकडून तोडफोड करण्यात आली. वसंत मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून झाल्यावर थेट आगार प्रमुखांचे कार्यालय गाठले. त्यांनी आगार प्रमुखांकडून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे त्यांनी थेट सुरक्षा रक्षकाच्या केबीनच्या काचा फोडल्या. आम्ही घटनास्थळाची पाहणी केली. तेथील बसच्या आजूबाजूला शेकडो कन्डोम पडलेले आहेत. याचा अर्थ आजच असला प्रकार घडला असे नाही. असले प्रकार इथे रोज होतायेत. येथील सुरक्षारक्षक काय करतात? केवळ खुर्चा उबवायला येतात की काय? मला तर वाटते त्यांचाही या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय मोरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आगारप्रमुख आणि या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

स्वारगेट बस डेपोमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये त्या तरुणीवर अत्याचार झाला, त्या बसच्या दरवाजाला लॉक नसून एक दोरी बांधलेली आहे. तेथे सुरक्षा रक्षकही नाहीत. त्यामुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.