‘वंदे भारत’ ट्रेनच्या छताची गळती? ट्रेनमधला व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचा आला रिप्लाय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने केलेल्या कामांपैकी आणि लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीमध्ये अनेकदा अधोरेखित करण्यात आलेलं काम म्हणजे वंदे भारत ट्रेन.

एकीकडे बुलेट ट्रेनचं काम सुरु असतानाच मोदी सरकारने देशातील अनेक भागांमध्ये वंदे भारत ट्रेन्स सुरु केल्या. या ट्रेन्समध्ये विमानासारख्या सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात असं सांगण्यात आलं. या ट्रेन्सने प्रत्यक्षात आपल्या फेऱ्या सुरु केल्यानंतर अनेकांनी या ट्रेन्सचं कौतुक केलं. मात्र एकीकडे या ट्रेन्सचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे या ट्रेन्सकडे लक्ष देण्याच्या नादात रेल्वे तसेच सरकारने सर्वसामान्य ट्रेन्सकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीही नोंदवण्यात आल्या.

आता वंदे भारत ट्रेन एका प्रवाशाने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये या देशातील प्रिमिअम ट्रेनमध्ये चक्क पावसाचं पाणी गळताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून रेल्वेकडूनही या व्हिडीओला रिप्लाय देण्यात आला आहे.

 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये वंदे भारत ट्रेनचा डबा सुरु होतो त्या ऑटोमॅटिक दरवाजाजवळच्या पहिल्याच सीटजवळ लावलेल्या डिजीटल स्क्रीनसमोर छतामधून पाणी गळत असताना दिसत आहे. या ट्रेनमधील सीटवर कोणीही बसलेले नसले तरी ट्रेनच्या छतामधून पडणारा धबधबा हा खरोखरच धक्कादायक आहे. भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणाऱ्या प्रिमिअम तिकीटदरांमध्ये या ट्रेनचा समावेश होतो. असं असतानाही ही अशी सेवा पुरवली जात असल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला आहे. “भारतामधील सर्वोत्तम प्रवासी ट्रेन्सपैकी एक असलेली वंदे भारत ट्रेन पाहा. या ट्रेनच्या छप्परामधून पाणी गळत आहे. दिल्ली-वाराणसी मार्गावर ही वंदे भारत धावते. या ट्रेनचा व्हिडीओ सोबत ट्रेनचा क्रमांक सुद्धा एका व्यक्तीने शेअर केला आहे.

रेल्वेकडून रेल्वे सेवा अकाऊंटवरुन या पोस्टवर रिप्लाय करण्यात आला आहे. “संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आलेली आहे,” असा रिप्लाय रेल्वे सेवा अकाऊंटवरुन देण्यात आला आहे. तसेच या व्यक्तीकडून प्रवासासंदर्भातील माहिती आणि त्याचा फोन नंबरही रेल्वे प्रशासनाने थेट मेसेजच्या माध्यमातून मागितला आहे.