उरण हत्याकांड; दाऊदने यशश्रीची हत्या का केली? यशश्रीच्या हत्येचे खरे कारण आले समोर

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात महत्तवाची अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेखला अटक केल्यानंतर मंगळवारी मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पण यशश्रीची निर्घृणपणे हत्या करण्यामागचे कारण सांगितले नव्हते. पण आता दाऊदने यशश्रीच्या हत्येचे कारण सांगितले आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, यशश्रीने लग्नाला नकार दिल्याने आपण तिची हत्या केल्याचे दाऊदे सांगितले आहे. या प्रकरणी यशश्रीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दाऊदविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर दाऊद शेख फरार होता. आरोपी दाऊद शेखला अटक केल्यानंतर मंगळवारी मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. आज (३१ जुलै) त्याला पोलीस बंदोबस्तात कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. दरम्यान, यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी उरणच्या जनतेकडून झाली होती.

त्यानतंर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात येणार असून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांसोबत चर्चा केल्यानंतर यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या असून या प्रकरणातील पिडीत मुलीची बाजू कोर्टात मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची आम्ही नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, २०१८-१९ पूर्वी यशश्री शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्रीही होती. उरणमध्ये यशश्री ज्याठिकाणी राहायची त्याचठिकाणी दाऊदही राहात होता. पण २०१९ मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली आणि त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणात त्याला तुरूंगातही जावे लागले होते, तुरुंगातून सुटल्यावर तो कर्नाटकला गेला होता. त्यानंतर तो पुन्हा उरणमध्ये आला. उरणमध्ये आल्यावर त्याने यशश्रीशी फोनद्वारे संपर्क केला.त्यावेळी दोघांचं भेटायचे ठरले. या भेटीत यशश्रीने लग्नाला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या दाऊदने तिची हत्या केली.