
सरकारवर जोरदार टिका करत ‘या’ नेत्याने घेतली शपथ, उद्या स्वतः मारणार फटके, उपवासही करणार

चेन्नई – तामिळनाडूमध्ये जोपर्यंत द्रमुकचा पाडाव होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही. असा अजब संकल्प भाजपा नेते अण्णामलाई यांनी केला आहे. तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी स्वत:ला सहा वेळा फटके मारणार आहे, असाही संकल्प त्यांनी केला आहे.


चेन्नईच्या अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी सत्ताधारी द्रमुक सरकारवर टीकास्त्र सोडत शपथ घेतली आहे. ते म्हणाले, “द्रमुक सरकार पाडेपर्यंत मी अनवाणी चालेन, मी माझ्या घरासमोर आंदोलन करणार. स्वत:ला ६ वेळा आसुडाचे फटके मारून घेईन. उद्यापासून ४८ दिवसापर्यंत उपवास करेन आणि सहा हातांच्या मुरुगनला आवाहन करेन, असा संकल्प सोडला आहे. राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी द्रमुक सरकारवर आरोप करताना संतप्त झालेल्या अन्नामलाई यांनी आपले बूट काढले आणि सांगितले की जोपर्यंत राज्यातील द्रमुक सरकार उलथून टाकले जात नाही तोपर्यंत ते अनवाणी फिरणार आहेत. दरम्यान मी राज्यातील जनतेला आवाहन करतो की त्यांनी सरकारचा कारभार पहावा. मी निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटणार नाही. आम्ही पैसे न वाटत निवडणूक लढवणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. आज भाजपा नेत्यांनी आंदोलन केले त्यावेळी पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे बुधवारी सकाळी अण्णा विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.









