पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि फडणवीसांची उपस्थिती, महिलांना होणार लाभ

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील ‘उमेद सावित्री’ या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

मान्यवरांनी दालनाची पाहणी करून महिलांशी संवाद साधला आणि दालनातील वस्तूंची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी बचत गटातील महिलांना शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्हा परिषद महिला बचतगटांच्या वस्तूंच्या एकत्रित विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी तसेच या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. त्यातूनच सन २०२४ मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पुणे यांच्या माध्यमातून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ केंद्रावर विक्री केंद्र मिळविण्यासाठी प्रयत्न केला. त्याला विमानतळ प्रशासनाने सकारात्मक सहकार्य केले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे ‘अवसर’ या योजनेंतर्गत स्थानिक स्वयं सहायता समूहातील कुशल कारागीरांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी विमानतळावर विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेंतर्गत ‘उमेद’च्या स्वयंसहायता बचत गटांच्या महिलांना या दालनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रात महिला बचत गटांना पहिल्यांदाच अशी संधी मिळाली आहे.

याप्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन विकास मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, आमदार जगदीश मुळीक, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते.