येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी १५ हजार रुपये लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई धाराशिव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दि.२६ रोजी सापळा रचून केली. येरमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रकाश नामदेव चाफेकर व चालक पोलीस नाईक महेश जालिंदर सांगळे उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुळजापूर असे लाच घेताना अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत ४२ वर्षीय व्यक्तीने धाराशिव एसीबीकडे सोमवारी दि.२४ रोजी तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी चाफेकर याने सांगळे मार्फत तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता चाफेकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून सांगळे याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दोघांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.