महाराष्ट्रात दहीहंडी उत्सवाला गालबोट दोघांचा मृत्यू

महाराष्ट्रात विविध गटात शेकडो गोविंदा जखमी, उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले

मुंबई – महाराष्ट्रात दहीहंडीच्या उत्सवात दोघांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. मानखुर्दमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. महाराष्ट्रात दहीहंडीच्या विविध घटनांत १०० वर गोविंदा जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

बाल गोविंदा पथकातील ३२ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे.तर गावदेवी गोविंदा पथकातील रोहन वाळवी या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. मानखूर्दच्या महाराष्ट्र नगरातील बाल गोविॅदा पथकातील ३२ वर्षीय जगमोहन चौधरी या गोविंदाचा मृत्यू झाला. दहीहंडीची दोरी बांधताना पथकातील एक सदस्य खाली पडला. जखमीला ताबडतोब गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या निमित्ताने नव्या मुंबईत विविध कार्यक्रमास हजेरी लावली होती. एकनाथ शिंदेंचा घनसोलीतील शेवटचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे स्टेजवरून खाली उतरत असताना अचानक स्टेज खचला. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते जमा झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला. मात्र, शिंदे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले आणि सुरक्षितपणे घटनास्थळावरून बाहेर काढले. यंदा अनेक ठिकाणी दहीहंडीसाठी लाखोंच्या घरात बक्षिसांची रक्कम जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये थरांसाठी तीव्र स्पर्धा दिसून आली. मात्र, या स्पर्धेच्या नादात अनेक ठिकाणी सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.

दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला. दरवर्षी सुरक्षा कवच म्हणून गोविंदांचा विमा ही काढण्यात येतो . यावर्षी तर तब्बल दीड लाख गोविंदाचे विमा उतरवण्यात आलेत. मात्र त्याच्या सुरक्षेसाठी ठोस अशी पावलं का उचलली जात नाही? असा सवाल दहीहंडी उत्सवात झालेल्या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.