चहावाल्याच्या अफवेमुळे गेले बारा प्रवाशांचे जीव

जळगाव रेल्वे अपघाताचे खरे कारण समोर, ही चूक पडली महागात, पोलीसांकडून त्या दोघांचा शोध सुरु

जळगाव – जळगावमध्ये एका अफवेमुळे मोठा रेल्वे अपघात झाला, त्यामध्ये १२ प्रवाशांचा चिरडून मृत्यू झाला. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. पुष्पक एक्स्प्रेसचा हा अपघात एका अफवेमुळे झाला आहे. त्याला एक चहावाला कारणीभूत असल्याची चर्चा होत आहे.

पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने ही दुर्घटना घडल्याचं उघड झालं आहे. तसेच एका चहावाल्यानेच ही अफवा पसरवल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस या चहावाल्याचा आणि एक्सप्रेसची चैन खेचणाऱ्याचा शोध घेत आहेत. अपघातात जखमी झालेल्या लखनौच्या एका प्रवाशाने सांगितलं की, ‘एक चहावाला म्हणाला की ट्रेनमध्ये आग लागली आहे. रेल्वे उभी होती. त्यामुळे सगळे पळायला लागले. खाली उतरून पळत असताना समोरून ट्रेन (कर्नाटक एक्स्प्रेस) आली. इंजिननंतर तीन डब्बेच एक्स्प्रेसने पार केले. जर पूर्ण ट्रेन पार करून कर्नाटक एक्स्प्रेस गेली असती, तर सगळेच्या सगळे मेले असते, अशी आपबीती सांगितली. चहावाल्याने अफवा पसरवली आणि दुसऱ्या तरुणांने एक्सप्रेसची चैन खेचली. त्यामुळे एक्सप्रेसने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे चाकांमधून आगीच्या मोठमोठ्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेवर प्रवाशांचा विश्वास बसला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता धडाधड एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. पळत शेजारच्या रेल्वे रुळावरून जात असताना समोरून बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने येत होती. या रेल्वेने प्रवाशांना जोरात धडक दिली आणि पुढे जाऊन थांबली. या अपघातात मयत झालेल्या प्रवाशांच्या शरीराचे तुकडे झाले होते. दरम्यान पोलीस प्रवाशांशी विचारपूस करून या मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. ओळख पटलेल्या मृतांमध्ये चारजण नेपाळचे आहेत. तर तीन जण हे उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहेत.

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात रेल्वेने धडकून झालेल्या १२ प्रवाशांच्या मृत्यूबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही शोक व्यक्त केला आणि त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन दिले. रेल्वेमंत्र्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दीड लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी ५,००० रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे.