
पतीला पत्नीपासून घटस्फोट पाहिजे होता. मात्र, पत्नी घटस्फोट देत नव्हती. यातच पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पैशांची मागणी केली. मात्र, घटस्फोट देत नसल्याच्या राग अनावर झाल्याने ‘खूप झालं आता तुझी नाटकं, संपवूनच टाकतो तुला’ असे म्हणत पत्नीला मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना कोथरुड येथील भुसार कॉलनी येथे राहत्या घरी १८ जून रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय पत्नीने पतीविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पतीवर आयपीसी ३०७ , ५०९, ३२३ , ५०४, ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघांमध्ये कौटुंबिक वाद आहेत. पती पत्नीकडे सातत्याने घटस्फोटासाठी मागणी करत आहे. परंतु पत्नी घटस्फोट देत नव्हती. दरम्यान, पत्नीने पतीकडे घर खर्चासाठी पैसे मागितले. मात्र, घटस्फोट देत नसल्याच्या रागातून तिला ढकलून दिले. तिचा गळा दोन्ही हाताने दाबून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.









