खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ; आरटीओ एजंटकडे केली खंडणीची मागणी

निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचे सांगून खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन आरटीओ एजंटकडे खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते २७ जून २०२४ या कालावधीत आरटीओ कार्यालयात घडला आहे.

याबाबत देवेंद्र हिरालाल खिंवसरा यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ललित पंडोळे व अजय पोपट मखरे यांच्यावर आयपीसी १८१, १८२, २११, ३८४, ३८९, ५००, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना मागील ८ ते ९ महिन्यापासून वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन संपर्क साधला. त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली.

आरोपींनी फिर्यादी यांना खोट्या केसेस मध्ये गुंतवून त्यांना मानसिक त्रास देऊन पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही तर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. आरोपी ललित पंडोळे याने निवृत्त पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्याच्या मोबाईल क्रमांकावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरून फिर्यादी यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाकडून अटक पूर्व जामीन मिळवला आहे. असे असताना ललित पंडोळे याने फिर्यादी यांच्या फोटोचा वापर करुन त्यावर गुन्ह्याचा नंबर टाकून फरार आरोपी असे लिहून, तसेच बोगस आरटीओ एजंट असा टॅग लावून सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.