थायलंडमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व, या उत्तराने जिंकली स्पर्धा, कोण आहे ती?
जयपूर – राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब जिंकला. गेल्या वर्षीची विजेती रिया सिंघा हिच्या हस्ते मणिकाला मुकुट प्रदान करण्यात आला.
मनिका विश्वकर्मा आता ७४ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या स्पर्धेत एकूण १३० देशांच्या सुंदरी सहभागी होतील. मिस युनिव्हर्स इंडिया बनलेल्या मनिकाने याआधी मिस युनिव्हर्स राजस्थान २०२४ चा ताजही आपल्या नावावर केलेला आहे. उत्तर प्रदेशची तान्या शर्मा ही पहिली उपविजेती ठरली, तर हरियाणाची मेहक धिंग्रा ही दुसरी उपविजेती आणि अमिशी कौशिक ही तिसरी उपविजेती ठरली आहे. अंतिम फेरीत मनिकाला विचारलं, जर तुम्हाला महिला शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देणे यापैकी एक निवडायचे असेल तर तुम्ही काय निवडाल? या प्रश्नाचे उत्तर देताना मनिका म्हणाली – महिलांना बऱ्याच काळापासून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. परिणामी आपल्या लोकसंख्येचा अर्धा भाग शिक्षणापासून दूर आहे. इतकी कुटुंबे गरीब आहेत. म्हणून, जर मला संधी मिळाली तर मी महिला शिक्षणाला प्राधान्य देईन, असे उत्तर मनिकाने दिले होते. मनिकाने तिच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि तिच्या मार्गदर्शकांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले आहे की आता माझे ध्येय भारताचे सर्वोत्तम पद्धतीने प्रतिनिधित्व करणे आणि मिस युनिव्हर्सचा मुकुट घरी आणणे आहे. मनिका राजस्थानच्या श्रीगंगानगरची राहणारी आहे. सध्या ती दिल्लीत राहते. ती राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे.
https://www.instagram.com/share/reel/BA-gQeg84o
मनिकाने यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत ‘बिमस्टेक सेवोकोन’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. एक उत्कृष्ट वक्ता आणि कलाकार म्हणूनही तिची ओळख आहे. ललित कला अकादमी आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांसारख्या नामांकित संस्थांनी तिचा सन्मान केला आहे.