
पुणे – महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी पार पडला. तर १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. अनेक आमदारांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाराजांची मनधरणी करण्याचं आव्हान महायुतीतील तिन्ही पक्षांसमोर आहे. पण मंत्रीपद मिळूनही एका महिला आमदाराला अश्रू अनावर झाले होते.

भाजपच्या पर्वती मतदारसंघातील आमदार माधुरी मिसाळ या मंत्रीपद मिळूनही नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने माधुरी मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये माधुरी मिसाळ ढसाढसा रडल्या. माधुरी मिसाळ यांनी आपल्या मनातील सल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे आणि गिरीश महाजन यांच्यासमोर बोलून दाखवली आहे. आपल्यापेक्षा ज्युनिअर आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र आपल्याला राज्यमंत्रिपद देण्यात आले. अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ असून देखील कॅबिनेट मंत्रिपदासाठी डावललं गेलं. तर इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर संधी देण्यात आल्याची खंत मिसाळ यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान महायुतीतील तिन्ही नेत्यांमध्ये खातेवाटपावरून चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर खातेवाटपाचा नारळ फुटतो की पुन्हा दिल्लीवारी करावी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


पुण्यातील पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ २००९ ते २०२४ अशा सलग चौथ्यांदा आमदार झाल्या आहेत. विजयाचा चौकार लगावल्यानंतर भाजपने त्यांना राज्य मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. पुणे महापालिकेच्या नगरसेविका ते आमदार आणि आता राज्यमंत्री असा माधुरी मिसाळ यांचा प्रवास राहिला आहे.









