
इंग्लड दाैऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, दिग्गजांना बाजूला सारत झाला कर्णधार, असा असेल संघ

मुंबई – इंग्लड दाैऱ्यापुर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय समोर नव्या कर्णधार आणि संघ निवडीचे आव्हान होते. पण आज बीसीसीआय संघाबरोबरच नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका ३० जूनपासून सुरू होईल. या मालिकेत दोन्ही संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग म्हणून भिडणार आहेत. पण भारतीय संघाचा कर्णधार कोण असणार याविषयी बरीच चर्चा होत होती. अखेर बीसीसीआयने कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली असून, युवा फलंदाज शुभमन गिल याच्याकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कर्णधारपदासाठी जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांची नावे चर्चेत होती. अखेर गिलकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. गिलने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे कसोटी पदार्पण केले होते आणि आतापर्यंत २५ कसोटी सामन्यांमध्ये १४९७ धावा केल्या आहेत. गिलच्या नावाची घोषणा करताना आगरकर म्हणाले, “शुभमन गिल हा कसोटी संघाचा कर्णधार असेल, आणि ऋषभ पंत उपकर्णधार म्हणून काम पाहिल. पंतने आयपीएल २०२५ मध्ये प्रभावी पुनरागमन केल्यानंतर पुन्हा एकदा संघात महत्त्वाची भूमिका बजावण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान गोलंदाज मोहम्मद शमी याची तब्येत अजूनही ठीक नाही. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली नाही.
इंग्लड दाैरा
पहिली कसोटी – २० ते २४ जून
दुसरी कसोटी – २ ते ६ जुलै
तिसरी कसोटी – १० ते १४ जुलै
चौथी कसोटी – २३ ते २७ जुलै
पाचवी कसोटी – ३१ जुलै ते ३ आॅगस्ट
भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इस्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.









