उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, आयोगाची घोषणा
दिल्ली – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाने देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आयोगाने यासाठी राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. या निवडणुकीसाठी “राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम, १९५२” आणि त्याखालील “नियम, १९७४” लागू होतात. या अधिनियमाच्या कलम ३ नुसार, निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करतो, ज्यांचे कार्यालय नवी दिल्ली येथे असते. याशिवाय, एक किंवा अधिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीही नियुक्त केले जाऊ शकतात. परंपरेनुसार, लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालयाचे महासचिव हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आलटून पालटून नियुक्त केले जातात. मागील उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी लोकसभा सचिवालयाचे महासचिव निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्याअनुषंगाने, आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यसभा सचिवालयाचे महासचिव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कायदा व न्याय मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार आणि राज्यसभेचे उपसभापती यांची संमती घेऊन करण्यात आली आहे. याशिवाय, श्रीमती गरिमा जैन, संयुक्त सचिव (राज्यसभा सचिवालय) आणि श्री विजय कुमार, संचालक (राज्यसभा सचिवालय) यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राजपत्र अधिसूचना स्वतंत्रपणे प्रकाशित करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. दरम्यान सद्यस्थितीत लोकसभेमध्ये सत्ताधारी एनडीएला २९३ सदस्यांचा पाठिंबा आहे. तर राज्यसभेमध्ये एनडीएला १२९ सदस्यांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय इतर काही सदस्यही त्यांना पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे एनडीएला पाठिंबा असलेल्या सदस्यांची संख्या ४५७ पर्यंत पोहोचले. ही संख्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ३९२ या आकड्यापेक्षा ६५ ने अधिक आहे. तर विरोधी पक्षांकडे लोकसभा आणि राज्यसभेत मिळून ३२५ सदस्यांचं संख्याबळ आहे. हा आकडा विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापेक्षा फार कमी आहे.
जगदीप धनखड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदावर नव्या व्यक्तीची निवड करण्यासाठीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.