मागील वर्षात देशातील या पक्षाला मिळाली हजारो कोटींची देणगी

दिल्ली – राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. तर दुस-या क्रमांकावर असलेला काँग्रेस भाजपाच्या जवळपास देखील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर पक्षांचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

भाजपाला २०२३-२०२४ या वर्षात कंपन्या, ट्रस्ट आणि लोकांकडून वैय्यक्तिक स्वरुपात २२४४ कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला २०२३-२०२४ मध्ये २८८.९ कोटी रुपये मिळाले आहेत. भाजपाच्या २०२३-२०२४ मधील देणग्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाने ७४२ कोटी आणि काँग्रेसने १४६.८ कोटी रुपये देणगी मिळाल्याचे जाहीर केले होते. सविस्तरपणे पाहिल्यास भाजपाला एकूण मिळालेल्या देणग्यांपैकी ८५० कोटी रुपये इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून मिळालेले आहेत. यामध्ये प्रुडंटकडून ७२३ कोटी रुपये, ट्रायम्फ इलेक्टोरल ट्रस्टकडून १२७ कोटी रुपये आणि एनझिगार्टिंग इलेक्टोरल ट्रस्टकडून १७.२ लाख रुपये मिळाले आहेत. काँग्रेसला ट्रस्टच्या माध्यमातून १५६ कोटी रुपये मिळाले आहेत. प्रुडंट ट्रस्ट त्यांचा एकमेव देणगीदार होता. इतर पक्षांचा विचार केल्यास बीआरएसला ४९५.५ कोटी रुपये इलॉक्ट्रोल बाँडमधून मिळाले आहेत. डीएमके ला ६० कोटी रुपये आणि वायएसआर काँग्रेसला १२१.५ कोटी रुपये मिळाले आहेत. जारखंड मुक्ती मोर्चाने ११.५ कोटी रुपये मिळाल्याचे जाहीर केले आहे.

निवडणूक रोखेमधून मिळालेल्या देणग्या भाजप आणि काँग्रेसच्या देणगीच्या आकड्यांत समाविष्ट नहीत. कारण, नियमांनुसार राजकीय पक्षांनी हे तपशील फक्त त्यांच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालांत जाहीर करायचे असतात. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने फ्रेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केली होती.