
मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आणि खातेवाटप मार्गी लागल्यांतर नव्या मंत्र्यांना दालने आणि बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये भाजपाचे क्रमांक दोनचे नेते प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला होता. त्यामुळे बावनकुळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेर तो बंगला पंकजा मुंडे यांना देण्यात आला आहे. पण देवगिरी बंगल्याचा इतिहास अनेक शुभ अशुभ कारणांमुळे चर्चेत आला आहे.

पंकजा मुंडे यांना मिळालेल्या रामटेक बंगल्याची कहाणी खूप मोठी रंजक राहिलेली आहे. या बंगल्यात राहणारे मंत्री कोणत्या ना कोणत्या वाद-विवादात अडकतात, असा इतिहास राहिलेला आहे. माजी मंत्री दीपक केसरकर, एकनाथ खडसे आणि छगन भुजबळ यांचं वास्तव्य ह्याच बंगल्यात होतं. मात्र अलिकडे झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात केसरकर आणि भुजबळ यांना डच्चू मिळाला आहे. तर खडसे यांचे राजकारण अस्ताला गेले आहे. आघाडी सरकार असताना १९९९ साली हा बंगला छगन भुजबळ यांना देण्यात आला होता. त्यावेळी तेलगी प्रकरणात त्यांचे नाव आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर २०१४ साली युती सरकारच्या काळात कृषिमंत्री एकनाथ खडसेंनी रामटेक बंगला मिळाला होता. मात्र त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. हा बंगला भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी वाटप झाल्याच आदेश दुपारी निघाला होता. पण नंतर सूत्रे हलली आणि ‘रामटेक’ निवासस्थान पंकजा मुंडे यांना देण्यात आले. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांचे वास्तव्य याच बंगल्यात होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आधी मंत्रीपदावरून, नंतर खातेवाटपावरून काही नेत्यांमध्ये नाराजी होती. आता बंगले वाटपावरूनही काही मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. काही मंत्र्यांना पूर्वीचे आहे तेच बंगले देण्यात आले आहेत.









