
महापालिका निवडणूकीसाठी भाजपाचे नियोजन सुरु, फडणवीसांचा खास आमदाराच्या हाती मुंबईची सूत्रे?

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काळात लवकरच जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षानी तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवीन अध्यक्ष निवडीची शक्यता आहे.

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष आहेत. पण भाजपात एक नेता एक पद हे धोरण असल्यामुळे आता त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवड केली जाणार आहे. लवकरच मुंबई अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या साठी मुंबईतील दोन आमदारांच्या नावाची चर्चा आहे. मिशन महापालिका लक्षात घेऊन भाजपने मुंबईचे नेतृत्व नव्या चेहऱ्याकडे देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये, आमदार प्रविण दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेत आहेत. प्रवीण दरेकर हे भाजपचे आमदार असून ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेही राहिले होते. दरेकर हे भाजपचे राज्य सचिव आणि भाजपच्या सहकार विभागाचे प्रमुखही आहेत. तर, अमित साटम हेही भाजप आमदार असून त्यांनी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. गेल्या १० वर्षांपासून ते येथील मतदारसंघात आमदार आहेत. हे जरी असले तरी दरेकर यांना अध्यक्ष केली जाण्याची शक्यता आहे. पण भाजपाने धक्कातंत्र वापरल्यास नवीन चेहरा देखील अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जिंकायचे मिशन भाजपकडून राबवले जात आहे. त्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने नवी रणनीती आखायला सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने भाजपने मुंबईत भाकरी फिरवण्याच्या तयारी सुरू केली आहे, त्याचा फायदा किती हे येणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.









