अजित पवार गटाचे हे कॅबिनेट मंत्री नाॅट रिचेबल

मुंबई – महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन खातेवाटपही करण्यात आले आहे. पण असे असूनही मंत्री आणि त्यांचे रूसवेफुगवे संपलेले नाहीत. अनेकांनी मनासारखी खाती न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता अजित पवारांच्या मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील नाराज असल्याचे समोर आले आहे.

दत्तात्रय भरणे नाराज असल्याने त्यांनी अजूनही मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेला नाही. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय भरणे हे सहकुटुंब परदेशात गेले आहेत. क्रीडा खातं मिळाल्याने दत्तात्रय भरणे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अजूनही आपल्या मंत्रिपदाचा कारभार स्वीकारलेला नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू म्हणून दत्तात्रय भरणेंची ओळख आहे. इंदापूर मतदारसंघातून हॅट्ट्रिक करणाऱ्या दत्तात्रय भरणेंची ओळख ही जायंट किलर अशी आहे. कारण त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सलग तीनवेळा पराभव केला आहे. भरणे मंगळवारी भारतात येतील, अशी माहितीही त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाने दिली आहे. त्यामुळे आता त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर केली जाते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र दत्तात्रय भरणे यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील घटक पक्षात सुरु असलेले नाराजी नाट्य संपण्याचे नाव घेत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून नाराजी पुढे येत आहे. त्यामुळे नाराजांची समजूत काढताना तीन घटक पक्षाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.