
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केलेली रोमँटिक पोस्ट व्हायरल, पतीच्या जाॅबचे आणि तुमच्या मोबाईलचे आहे खास नाते

मुंबई – बॉलिवूड संगीत विश्वातील प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल तिच्या सुमधुर आवाजामुळे प्रत्येकाच्या मनावर राज्य करते. आजवर तिने विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यामुळे श्रेयाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. नुकतीच श्रेयाची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.


गायिका श्रेया घोषालने ५ फेब्रुवारी २०१५ रोजी शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केले. नुकतीच तिच्या सुखी संसाराला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त गायिकेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर आपल्या लग्नातील सुंदर क्षण फोटोंच्या माध्यमातून दाखवत श्रेया घोषालने कॅप्शन देत म्हटलंय, “आपल्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा…! मला आजही तो दिवस आठवतो जणू हे सगळं कालच घडलंय, असं वाटतं. आपण एकमेकांसाठी आहोत हीच मुळात आनंदाची गोष्ट आहे. या प्रवासात, आम्ही आणखी एकमेकांमध्ये अडकत गेलो. शिवाय आमचा मुलगा देवयान हा देवाने आम्हाला दिलेला आणखी मोठा आशीर्वाद आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ…!” पुढे श्रेया घोषालने लिहिलंय, “तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल मनापासून आभार…!” श्रेयाच्या पतीबद्दल बोलायचे झाल्यास शिलादित्य मुखोपाध्याय हा कॉलर आयडी आणि स्पॅम ब्लॉकिंग ॲप Truecaller साठी एका मोठ्या पदावर काम करतो. तसेच एप्रिल २०२२ पासून Truecaller फॉर बिझनेसचा ग्लोबल हेड म्हणून तो या कंपनीत कार्यरत आहे. दरम्यान गायिकेने ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनशेवटी श्रेयादित्य, श्रेयादित्यान असे हॅशटॅग दिले आहेत. सोशल मीडियावर श्रेया आणि शिलादित्य यांच्या लग्नातील हे अनसीन फोटो बरेच व्हायरल होत आहेत.
https://www.instagram.com/p/DFsGqk4NMio/?igsh=bHYzbGNwcWpkczI1
श्रेया घोषालने आतापर्यंत विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. शिवाय अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही तिने जिंकले आहेत. आपल्या गोड आवाजाने तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीच्या गायिकांमध्ये तिचं नाव अव्वल स्थानावर आहे.










