
या अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत सांगितलं चित्रपटाचं नाव, चित्रीकरणालाही सुरूवात

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मध्यंतरी घटस्फोटामुळे मानसी चित्रपटापासून लांब होती. पण आता ती लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे.


सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मध्यप्रदेशात सुरुवात झाली आहे. ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट श्रेय पिक्चर्स कंपनीच्या बॅनरखाली तयार होत आहे. या चित्रपटाची निर्मिती नम्रता सिन्हा यांनी केली असून, त्यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही मालिका आणि वेबसीरिजची निर्मिती केली आहे. त्या सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते विनय सिन्हा यांच्या कन्या आहेत. ज्यांनी ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘नसीब’ यांसारख्या अनेक अजरामर हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. चित्रीकरणाला महाराष्ट्राबाहेर, मध्यप्रदेशात सुरुवात झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग मध्यप्रदेशातील इंदूर आणि परिसरात सुरू आहे. या चित्रपटाची कथा फक्त दोन पात्रांभोवती फिरत आहे. दिग्दर्शक आलोक जैन यांनी सुबोध आणि मानसी यांच्या व्यक्तिरेखांभोवती गुंफलेली ही कथा निश्चितच प्रेक्षकांना आकर्षित करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
https://www.instagram.com/p/DF9kwMZyMO4/?igsh=MWNqeDZtcG85bWY1bA==
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच सुबोध भावे आणि मानसी नाईक यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.मध्यप्रदेशातील नवनवीन लोकेशन्सवर चित्रिकरण सुरू असून, त्यामागचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.










