
अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद, ट्रोल करत कारवाईची मागणी, अखेर अशी केली सारवासारव

डेहराडून – अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी बोल्ड अंदाज, कधी स्टनिंग लूक तर कधी बेजबाबदार वक्तव्यामुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. पण सध्या तिच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. तसेच ती जोरदार ट्रोल देखील होताना दिसत आहे.


काही दिवसांपूर्वी उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत ‘बद्रीनाथ धामजवळ माझ्या नावाचं मंदिर आहे’, असा दावा केला आहे. ज्यावरून आता बद्रीनाथ येथील पंडितांनी संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत म्हटलंय, ‘बद्रीनाथ धामजवळ माझ्या नावाचं एक मंदिर आहे. त्या मंदिरात अनेक लोक जातात आणि फुल वाहून पूजा करतात’. जेव्हा उर्वशीला ‘हे तुझं मंदिर आहे का?’ असे विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘हो, हे माझं मंदिर आहे आणि माझी इच्छा आहे की दक्षिण भारतातदेखील माझं असंच एक मंदिर असावं’. उर्वशीच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद उफाळला आहे. उर्वशीच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. त्याचबरोबर मंदिराचे पंडित देखील संतप्त झाले आहेत. पंडित म्हणाले, ‘हा सर्व मूर्खपणा आहे. हे मंदिर कोणत्याही अभिनेत्रीचं नसून उर्वशी नावाच्या देवी सतीचे आहे. हे मंदिर हिंदू ग्रंथ पौराणिक कथांमध्ये पूजनीय असलेल्या देवी सतीशी संबंधित असून हे 108 शक्तीपीठांपैकी एक आहे. त्यामुळे कुणाचेही असे विधान अस्वीकार्य आहे आणि सरकारने असे दावे करणाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी केली आहे. दरम्यान उर्वशीच्या टीमने यावर खुलासा केला आहे. “उर्वशी रौतेलाने फक्त एवढंच म्हटलं होतं की तिच्या नावावर उत्तराखंडमध्ये मंदिर आहे. असं नाही म्हटलं की ‘उर्वशी रौतेलाचं’ मंदिर आहे. पण लोक नीट ऐकतच नाहीत. ‘उर्वशी’ आणि ‘मंदिर’ एवढंच ऐकून लगेच समजून घेतलं की लोक उर्वशी रौतेलाची पूजा करतात. आधी व्हिडीओ नीट ऐका, मग बोला.” असे म्हणत आपल्या वक्तव्यावर घुमजाव केले आहे.
https://www.instagram.com/reel/DIdVL6uBH4L/?igsh=OXhvNGdtaTg1eGZk
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात बामणी गावामध्ये उर्वशी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर बद्रीनाथ धामपासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे बद्रीनाथ धामला जाणारे सर्व प्रवासी या मंदिरात जाऊन देवी सतीचा आशीर्वाद घेतात. या मंदिरासंबंधित अनेक पौराणिक कथा आहेत.










