या महिला आमदार उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

उद्या होणार इतक्या वर्षानंतर ऎतिहासिक शपथविधी,भाजपाची इतक्या वर्षानंतर महिला मुख्यमंत्री?

दिल्ली – नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार विजय मिळवत ७० पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाने रेखा गुप्ता यांची नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे त्याच उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

रेखा गुप्ता यंदाच्या निवडणुकीत दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा तब्बल २९,५९५ मतांनी पराभव केला आहे. भारतीय जनता पक्षाची २७ वर्षानंतर दिल्लीमध्ये सत्ता आली आहे. १९९८ मध्ये सुषमा स्वराज या भाजपच्या दिल्लीतील शेवटच्या मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा पक्षाने महिला नेत्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेखा गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हरियाणातील जिंद जिल्ह्यात जन्मलेल्या रेखा गुप्ता ५० वर्षांच्या आहेत. रेखा गुप्ता यांचे कुटुंब १९७६ मध्ये दिल्लीला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर त्यांचे शिक्षण आणि राजकीय कारकिर्द दिल्लीतच घडली. रेखा गुप्ता यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले असून, त्या व्यवसायाने वकील देखील आहेत. दरम्यान दिल्लीतील रामलीला मैदानावर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाचे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या सोहळ्यासाठी आजच दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील २७ वर्षांची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने ४८ तर आम आदमी पक्षाने २२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला यंदा सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही.