छत्रपती शिवरायांच्या ‘या’ किल्ल्यांना मिळाले जागतिक वारसा मानांकन

महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक दुर्गसंपदेला मिळाली जागतिक ओळख

मुंबई – महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तब्बल १२ किल्ल्यांना जागतीक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ जिंजी- या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक हेरिटेज दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे बहुमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात सध्या ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत. आता १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट झाल्यामुळे हे किल्ले महाराष्ट्रातील ‘सातवे जागतिक वारसा स्थळ’ ठरतील. यामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तमिळनाडूमधील १ किल्ला असे एकूण १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले असून, त्यांची ‘अद्वितीय जागतिक मूल्य’ म्हणून नोंद घेतली गेली आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी हे आता जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यातर्फे या मानांकनासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या कामात वास्तुविशारद डॉ.शिखा जैन आणि पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे यांचे योगदान मोलाचे ठरले. ‘युनेस्को’च्या ४६व्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी, गड संवर्धन समिती सदस्य व तज्ज्ञांचा सहभाग होता. हे मानांकन केवळ ऐतिहासिक किल्ल्यांचे गौरवगान नाही, तर पर्यटन, संशोधन व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा निर्णायक टप्पा आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचे शौर्य, स्थापत्य परंपरा आणि स्वराज्यरचना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधोरेखित झाली आहे.

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या “अद्वितीय वैश्विक मूल्य हे निकष किल्ल्यांनी सहज पार केले. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.