लाडकी बहीण योजनेतून ‘या’ २६ लाख बहीणींना काढून टाकले

राज्य सरकारची मोठी कारवाई, योजनेत धक्कादायक गैरप्रकार उघड, पैसे वसूल केले जाणार?

मुंबई – महायुती सरकारने राज्यात सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महिलांमध्ये अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय ठरली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मासिक १५०० रुपयांचा सन्माननिधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे. पण आता या बहिणींचा निधी रोखण्यात येणार आहे.

लाडकी बहिण योजनेतंर्गत आतापर्यंत २.२५ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, आता योजनेतील मोठा गैरप्रकार समोर आला आहे. महिलांसाठीच्या या योजनेत १४,२९८ पुरुषांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, २६.३४ लाख महिलाही अपात्र असूनही लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना दिला जाणारा निधी बंद केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “शासनाच्या विविध विभागांकडून लाभार्थ्यांची माहिती मागवण्यात आली होती. तपासणी दरम्यान आढळले की अनेकांनी चुकीची माहिती देत अर्ज सादर केले. काहींनी एकापेक्षा अधिक योजना घेतल्या, काही कुटुंबांत दोनपेक्षा अधिक सदस्य लाभार्थी आहेत आणि काही अर्ज थेट पुरुषांनी केले आहेत. या पार्श्वभूमीवर, जून २०२५ पासून २६.३४ लाख अपात्र लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शहानिशा करून पात्र लाभार्थ्यांनाच पुन्हा योजनेचा लाभ दिला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे अपात्र ठरलेल्या व्यक्तींना पुढील सूचनांपर्यंत योजनेचा लाभ मिळणार नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अट म्हणजे अर्ज करणारी महिला फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असावी. दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर अर्ज अपात्र ठरेल. अशा विविध कारणांमुळे २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.

शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, अशीही माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.