सीमेवरील ही १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट होणार

नागरिकांकडे होते दोन्ही राज्याचे नागरिकत्व, दोन्ही राज्यात करायचे मतदान, सुविधा देण्याचे सरकारचे आश्वासन

मुंबई – महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या १४ गावांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. ही गावे महाराष्ट्रात समाविष्ट होणार असून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

तेलंगाणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील १४ गावे अनेक वर्षापासून विकासकामांपासून वंचित आहेत. ती गावे नेमकी कोणत्या राज्यात येतात यावर विवाद होता अखेर ती गावे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि जिवती तालुक्यांतील १४ गावे महाराष्ट्रात समाविष्ट केली जाणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात महाराष्ट्र आणि तेलंगण सीमेवर वसलेल्या १४ गावातील ५ हजार २९३ मतदार दोन्ही राज्यात मतदान करण्याचं विशेषाधिकार प्राप्त आहेत. या गावातील नागरिक १९८९ सालापासून दोन्ही राज्यात मतदान करत आहेत. ही गावे दोन राज्याच्या सीमेवर असल्याने दोन्ही राज्यानी या गावांवर दावा केला आहे. येथील नागरिकांकडे दोन्ही राज्याचे मतदानाचे ओळखपत्र आहे. शिवाय या गावातील नागरिक दोन्ही राज्याच्या सर्व सरकारी सेवासुविधा घेत असल्याचे दिसून आले आहे. मध्यंतरी महाराष्ट्र-तेलंगाणा राज्यांच्या सीमांवर वसलेल्या या १४ गावातील नागरिक कोणत्यातरी एकाच राज्याचे नागरिकत्व असावे यासाठी चंद्रपूर आणि तेलंगणातील आसिफाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित आंतरराज्य बैठक घेऊन उपाय काढण्याचा निर्णय घेतला होता. पण ती प्रक्रिया पुढे जाऊ शकली नव्हती. पण आता ती गावे महाराष्ट्रात येणार आहेत.

विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित विविध विषयांवरील बैठकांमध्ये ते बोलत होते. बैठकीला आमदार देवराज भोंगळे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा,आणि जिवती तालुक्यातील १४ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.