
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा वरिष्ठाधिकाऱ्यांना इशारा, पुणे येथे महसूल परिषदेचे उद्घाटन

पुणे – तलाठ्यापासून मंत्रालयातून राज्याचा कारभार चालवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण ‘एक परिवार’ आहोत हे ध्यानात ठेवून न घाबरता जनतेची कामे करावी. अनवधानाने झालेली चूक माफ करता येते, जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक जाणीवपूर्वक झाली तर माफी नाही, हेही लक्षात असू द्या, असा कानमंत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना दिला.

पुणे येथे दोन दिवस महसूल परिषद होत आहे. या परिषदेच्या उद्घाटन करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राची रूपरेषा आखली आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी पडेल ते कष्ट करा. महसूल विभागाला प्रशासनाचा कणा म्हणतात. त्यामुळे लोककल्याणकारी योजना राबविताना समाजाच्या शेवटच्या माणसाची काळजी घ्या. त्याचा कणा ताठ राहिला पाहिजे यासाठी जिवाचे रान करा. राज्याचा कारभार पारदर्शी आणि गतिमान करण्याचे काम महसूल विभागच करू शकतो, हा विश्वास मला आहे.
कार्यशाळेस अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.पुढील दोन वर्षात एकाही व्यक्तीची सुनावणी बाकी राहता कामा नये असा संकल्प करून महसूल विभागाचा देशात आदर्श निर्माण करावा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अतिशय दुर्दैवी आहेत.. आपण त्या थांबल्या पाहिजेत यासाठी काम करण्याची गरज आहे. शेतीला पाणी, पाणंद रस्ते, वीज देण्यासाठी पुढाकार घेऊन शेतकऱ्याला सुखी करण्याचे प्रयत्न होऊ द्या.आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत. जनतेने दिलेली मतं ही आम्ही कर्ज समजतो. त्यासाठी जनतेला उत्तरदायी राहणे हे आमचं कर्तव्य आहे. महसूल विभागाने लोकाभिमुख निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कामात आधुनिकीकरण आणि ए आयचा वापर झाला तर महसूल विभाग अधिक चांगले काम करत आहे हे लक्षात येईल. कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी कायम तुमच्या पाठीशी आहे. आपण मिळालेली जबाबदारी ही केवळ जबाबदारी न समजता नाविन्यपूर्ण काम केले पाहिजे. आपल्या काळात एखादे तरी काम चांगले जनतेच्या हिताचे झाले पाहिजे असा उद्देश ठेवा. अनेक किचकट कायदे सोपे केले पाहिजेत, कायदा करताना विधिमंडळातही महसूल विभागावर विश्वास दाखवला जातो.
कार्यक्रमावेळी भूमी अभिलेख बोधचिन्हाचे उद्घाटन करण्यात आले. त्याबरोबरच इप्सित, तीस भू प्रणाम केंद्र, ई मोजणी वर्जन टू आणि महा खनिज ऑटो या प्रकल्पांचेही उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले तर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आभार मानले.









