नागपूर – महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळातून अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. मात्र त्यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तसेच पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहेत.
भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर निशाना साधला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात मी असावं यासाठी आग्रह धरला होता. लोकसभेला मी जातो म्हणालो, पण त्यांनी माझे नाव जाहीर केले नाही. राज्यसभेची जागा आली, तेव्हा सुनेत्रा पवारांचं नाव आल्याने मी नाही म्हणालो. राज्यसभेची दुसरी जागा आली, तेव्हा दुसऱ्यांना शब्द दिला. तेव्हा आम्हाला सांगितलं की, राज्यात गरज आहे आणि आता मकरंद पाटलांना मंत्रिपद दिले. आता म्हणतायत राज्यसभेत जा. माझ्यासाठी ज्या लोकांनी जीव काढला, त्यांना मी काय सांगू. त्यामुळे मी राजीनामा देऊ शकत नाही. दोन वर्षात मी मतदारसंघाचे काम करेन, नंतर बघू, असे भुजबळ म्हणाले. दरम्यान मी माझ्या मतदार संघात आज जातोय . उद्या पुन्हा एक समता परिषेदेची बैठक आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा आहे. सुसंस्कृत पणे आपल्या भावना व्यक्त करा असे सांगितले. जोडे मारो आंदोलन करू नका असे आवाहन मी केले आहे. असेही भुजबळ म्हणाले आहेत. मंत्री पद न दिल्याने अजित पवार यांच्यावर भुजबळ यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो. विरोधी पक्षनेता झालो तेव्हा पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले. जर १९९९ साली कॉँग्रेस एक असती तर, मी मुख्यमंत्री झालो असतो. मी काँग्रेस सोडू नये म्हणून सोनिया गांधी यांच्यापासून अनेकांचे फोन आले होते. पण मी शरद पवार यांच्यासोबत गेलो, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.