
सिलेंडरच्या दरवाढीनंतर सामान्यांना आणखी एक धक्का, युनियनने घेतला हा निर्णय?, नेमक काय घडलं?

दिल्ली – सरकारने नुकतीच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करत सर्वसामान्यांना दणका दिला होता. पण आता गॅस वितरक देखील दणका देण्याच्या तयारीत असून त्यामुळे घरपोच गॅस मिळणार नाही.

एलपीजी वितरक युनियनने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स युनियनने केलेल्या मागण्या तीन महिन्यांत पूर्ण न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा युनियनने दिला आहे.यामध्ये एलपीजी वितरणावरील कमिशन किमान १५० रुपयांपर्यंत वाढवावे, अशी मागणी युनियनने केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे. एलपीजीचा पुरवठा मागणी आणि पुरवठा यावर आधारित असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. परंतु, तेल कंपन्या कोणतीही मागणी न करता जबरदस्तीने बिगर घरगुती सिलिंडर वितरकांना पाठवत आहेत, जे कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहे. हे त्वरित थांबवावे. उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या वितरणातही अडचणी येत आहेत, असे सांगून तीन महिन्यांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे युनियनने पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे गॅस मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. युनियनने एलपीजी वितरकांच्या मागण्यांबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयालाही पत्र लिहिले आहे. त्यामुळे सरकार यांच्या मागण्या पूर्ण करणार की संप होणार हे पहावे लागणार आहे.
केंद्र सरकारने ७ एप्रिल रोजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. त्यानंतर गॅसचे दर मुंबईत ८०२.५० रुपयांवरुन ८५३.५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. दुसरीकडे, उज्ज्वला योजनेंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्यांची परवड होणार आहे.









