…तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रचणार नवीन विक्रम

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी हे पद स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे जर त्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारल्यास ते पालकमंत्री होणारे पहिले मुख्यमंत्री होणार आहेत.

मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अजूनही पालकमंत्रीपदांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घ्यायची इच्छा जाहीर केली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केलं की, “मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व घेण्याची परंपरा नसते. मात्र, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घ्यायचं आहे, यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेईन,” असं ते म्हणाले आहेत. एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत. अद्याप कोणत्या जिल्ह्याचे पालकत्व कोण स्वीकारणार याबाबत कोणताही निर्णय झालेल नाही. परंतु दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री असलेला राज्याचा मुख्यमंत्री होतो हे एकनाथ शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने स्पष्ट झाले आहे. दरम्यान गडचिरोली हा राज्यातला मागास माओवाद प्रभावी जिल्हा असला तरी गेल्या काही वर्षात पालकमंत्री पदाच्या दृष्टीने या जिल्ह्याला वेगळच महत्त्व प्राप्त झाला आहे.

गडचिरोलीसाठी फडणवीसांची इच्छा स्पष्ट असली तरी इतर जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा निर्णय अद्यापही अधांतरी आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चर्चेनंतरच यावर अंतिम निर्णय होईल. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात पालकमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.