‘…तर अभयसिंहराजे भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते’

सातारा – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी अभयसिंहराजे भोसलेंवर अन्याय केला आहे. असे म्हणत पवार यांनी अभयसिंहराजेंचे खच्चीकरण केले असा आरोपही शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.

सातारा येथे पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, अभयसिंहराजे भोसले जर १९९९ मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नसते, तर काँग्रेसने त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले असते. त्या वेळी काँग्रेसमध्ये अभयसिंहराजे आणि विलासराव देशमुख हे दोघेच ज्येष्ठ नेते होते. त्यातही अभयसिंहराजे हे विलासराव देशमुखांना एक टर्म सिनियर होते. अभयसिंहराजेंवर कुठलेही आरोप नव्हते, संयमी नेतृत्व होतं,अभयसिंहराजेही आता हयात नाहीत. पण, एकच सांगतो की जसं अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं. तसं त्यांना पद दिलं नाही म्हणून सातारा जिल्ह्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सातारा जिल्ह्याचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. उरमोडी धरण भाऊसाहेब महाराज होते म्हणूनच झाले. या धरणातून आज सातारा माण खटाव या भागाला पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यावेळी संपूर्ण जिल्ह्याचे नुकसान झाले”, असा दावा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. तसेच माझ्यावर अन्याय झाला असे वाटत नाही. मात्र खा. शरद पवार यांनी माजी मंत्री स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला, असे म्हणत शिवेंद्रराजेंनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.

सातारा जिल्ह्यात एकेकाळी एकाच पक्षाला सगळे आमदार, खासदार निवडून मिळत होते. मात्र असे असूनही जिल्ह्याला मंत्रीपद मिळत नव्हते, आज भाजपने मात्र जिल्ह्याला भरभरून दिले आहे असे मत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.