त्यांचा नारा ‘बटेंगे तो कटेंगे’ तर आपला नारा ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ – खासदार इम्रान प्रतापगढी

हडपसर प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीला तेवढाच कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उमेदवारांचे प्रचार देखील जोरात सुरु आहे. रोज मतदारांशी संवाद साधणे ,बैठका घेणे ,कोपरा सभा, जाहीर सभा , बाईक रॅली , पदयात्रा अशा कार्यक्रमांना वेग आला आहे. प्रचारामध्ये आघाडीवर असलेले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी देखील प्रचाराचा धडाका सुरु ठेवला आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अशातच काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ कोंढव्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. कोंढव्यातील या सभेने निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तापली आहे.

या सभेला खासदार मोहम्मद फैजल, उमेदवार प्रशांत जगताप, अजमेर शरीफ दर्गा कमिटीचे चेअरमन अमीन पठाण यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कोंढवा भागातील पदाधिकारी उपस्थित होते. “ही निवडणूक केवळ आमदार निवडण्यासाठी नाही, तर जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात आहे. द्वेष विरुद्ध प्रेम अशी ही लढाई आहे. त्यांचा नारा ‘बटेंगे तो कटेंगे’ आहे, तर आपला नारा ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ असा आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या, महाराष्ट्राला लुटणाऱ्या भाजप व महायुतीला घरी बसवा,” असा हल्लाबोल काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केला.

इम्रान प्रतापगढी म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून भाजपाने देशात जातीवाद पसरवून हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातच्या रिमोट कंट्रोलवर महाराष्ट्र चालवण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात भाजपने फोडाफोडी केली, चिन्हे पळवली, पक्ष पळवला. मात्र, तुम्ही घड्याळ चोरलं, तरी वेळ कशी चोरणार? केंद्रातही दोन कुबड्यांवर आधारित सरकार आहे. भारताचे संविधान, महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्याची ही लढाई आहे. गुंड प्रवृत्तीने वागणाऱ्या नितेश राणे यांच्यासारख्या वाचाळवीरांना धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे. सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या प्रशांत जगताप यांना निवडून द्यावे असं आवाहन इम्रान प्रतापगढी यांनी केले आहे