
सर्पदंशाचं एक अतिशय अजब आणि हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका तरुणाला महिनाभरात पाच वेळा साप चावला. मात्र, प्रत्येक वेळी उपचारानंतर तरुण बरा झाला. साप चावल्यानंतर तो पुन्हा पुन्हा कसा बरा होतोय, याचं या तरुणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतंय. विशेष म्हणजे सापाच्या भीतीने तरुणाने आपलं घर सोडलं आणि मावशीच्या घरी राहू लागला. पण सापाने त्याला तिथेही सोडलं नाही.

ही घटना उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण फतेहपूर जिल्ह्यातील मलवा पोलीस स्टेशन हद्दीतील सौरा गावातील आहे. येथे राहणाऱ्या विकास दुबे याला एक ते दीड महिन्यात पाच वेळा साप चावला. मात्र प्रत्येक वेळी उपचारानंतर तो बरा झाला. त्याच्यावर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारण, नुकतंच त्याला पुन्हा साप चावला.

विकासच्या म्हणण्यानुसार, २ जून रोजी रात्री ९ वाजता बिछान्यातून उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला. त्यानंतर कुटुंबीय त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये घेऊन गेले. दोन दिवस तो तिथे दाखल होता. उपचारानंतर तो बरा होऊन घरी आला. ही एक सामान्य घटना असल्याचं कुटुंबीयांना वाटलं. मात्र १० जूनच्या रात्री पुन्हा सापाने चावा घेतला. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेलं. यावेळीही तो उपचारानंतर बरा झाला. मात्र, त्याला सापाची भीती वाटू लागली आणि त्याने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. मात्र सात दिवसांनंतर १७ जून पुन्हा घरात सापाने दंश केला. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडू लागली आणि कुटुंबीय घाबरले. मग त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन तो परत बरा झाला.
आश्चर्याची बाब म्हणजे चौथ्यांदा सापाने सात दिवसही जाऊ दिले नाहीत. घटनेच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सापाने विकासला चावा घेतला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, यावेळीही तो उपचारानंतर बचावला. अशा स्थितीत नातेवाईक आणि डॉक्टरांनी विकासला काही दिवसांसाठी दुसरीकडे पाठवण्याचा सल्ला दिला. सल्ल्यानुसार विकास हा त्याच्या मावशीच्या घरी राहायला गेला. मात्र, गेल्या शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा मावशीच्या घरातच साप चावला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला त्याच रुग्णालयात दाखल केलं, जिथे विकासवर सध्या उपचार सुरू आहेत.









