उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा जीव पोलिसांनी वाचवला. थोडा उशीर झाला असता तर तरुणाला जीव गमवावा लागला असता. यात ‘मेटा’ने महत्त्वाची भूमिका बजावली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाने एक्सपायरी डेट संपलेले औषध खात त्याचा व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘मेटा’ने लगेच पोलिसांना अलर्ट पाठवला. कोणताही वेळ न घालवता पोलीस अवघ्या १० मिनिटांत तरुण राहत ठिकाणी पोहोचले आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. यामुळे तरुणाचे प्राण वाचले.
ही घटना सैरपूर परिसरात घडली. येथे एका तरुणाने मैत्रिणीवरच्या नाराजीतून एक्सपायरी डेट संपलेले औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २. १८ वाजता सायरपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाने घरात ठेवलेल्या जुन्या औषधाचा ओव्हरडोज घेऊन आत्महत्या केल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. मेटा कंपनीने व्हिडिओवर तातडीने कारवाई करत डीजीपी कार्यालयाच्या सोशल मीडिया सेंटरवर ई-मेलद्वारे अलर्ट पाठवला. त्यानंतर डीजीपी प्रशांत कुमार यांच्या सूचनेनुसार, एसटीएफ कंट्रोल रूममधून लोकेशन ट्रेस केले गेले आणि दुपारी २. २८ वाजता पोलिस मीडिया सेलला माहिती देण्यात आली. सैरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे लोकेशन ट्रेस करण्यात आले. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत सैरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी आपल्या टीमसह तरुणाच्या घरी पोहोचले. त्यांनी तरुणाची समस्या ऐकून घेत त्याचे समुपदेशन केले.
यावेळी तरुणाने सांगितले की, त्याची मैत्रीण त्याला असे काही बोलली, ज्यामुळे त्याचे मन दुखावले. त्यामुळे त्याला आत्महत्या करायची होती. यातूनच त्याने घरात ठेवलेल्या जुन्या औषधाच्या १० गोळ्या खाल्ल्या. त्याने पुन्हा इंस्टाग्रामवर औषध घेत असल्याचा व्हिडिओ अपलोड केला. स्टेशन प्रभारींनी तात्काळ विद्यार्थ्याला पाणी प्यायला लावले आणि उलट्या करायला सांगितल्या. त्याला त्याच्या कुटुंबीयांसह रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्याच्यासोबत पोलीसही रुग्णालयात गेले. पुन्हा अशी चूक करणार नाही, असे आश्वासन तरुणाने पोलिसांना दिले.