
मुलीकडून झाडाची कुंडी पडल्यामुळे तिला समज देण्यासाठी गेलेल्या महिलेला अश्लील शिवीगाळ करुन पतीला बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका ४५ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार २४ जून रोजी उंड्री परिसरात घडला आहे. याबाबत ४२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुनिल प्रकाश तलरेजा (वय-४५ रा. कडनगर उंड्री, पुणे) याच्या विरुद्ध आयपीसी ५०९,३५२, ५०६, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी यांच्या घरासमोर असलेली झाडाची कुंडी आरोपीच्या मुलीने पाडली. त्यामुळे तिला समज देण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करुन अंगावर धाऊन गेला. तसेच फिर्यादी यांच्या पतीला बघून घेण्याची धमकी देऊन पतीला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.









