गेल्या तीन-चार वर्षांत लोकांमध्ये इन्स्टाग्राम रील्स पाहण्याचा आणि तयार करण्याचं वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. कर्नाटकमधील उडुपी शहरात राहणाऱ्या एका महिलेलाही रील बनवण्याची खूप आवड होती. तिचे फक्त १६ फॉलोअर्स असले तरी ती न थांबता सकाळ, संध्याकाळ, रात्री फक्त रील बनवत असायची.
पत्नीचं रील बनवण्याचं वेड पतीला खटकलं. त्याने संतापाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांनी आता आरोपी पतीला अटक केली आहे. जयश्री असं मृत महिलेचं नाव आहे. किरण उपाध्याय असं तिच्या पतीचं नाव आहे. तपासादरम्यान ही महिला सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असल्याचं आढळून आलं. रील बनवण्याचा तिचा छंद तिच्या नवऱ्याला सुरुवातीच्या काळात फारसा चुकीचा वाटला नाही. पण नंतर पत्नी दिवसरात्र रील बनवण्यात व्यस्त असल्याने दोघांमधील भांडणं हळूहळू वाढू लागली. गुरुवारी रात्रीही दोघांमध्ये हाणामारी झाली. वाद टोकाला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडण वाढल्यानंतर पतीने पत्नीला बेदम मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हे प्रकरण दडपण्यासाठी पतीने जखमी पत्नीला उडुपी येथील ब्रह्मावर येथील खासगी रुग्णालयात नेलं. घराच्या छतावरून पडून पत्नी जखमी झाल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी उडुपी येथील अज्जाराकाडू शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. याच दरम्यान तिला मृत घोषित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर चौकशीत त्याने सत्य सांगितलं.