राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच होणार लग्नसोहळा

मदर टेरेसा क्राऊन परिसरात घुमणार सनईचे सूर, राष्ट्रपती भवन आणि होणाऱ्या वधूचे आहे खास नाते

दिल्ली – दिल्लीतील राष्ट्रपती भवन अनेकांसाठी कुतुहल आणि अभिमानाची वास्तू आहे. अनेकांनी राष्ट्रपती भवनावर सरकारी कार्यक्रम आपण झालेले पाहिले असतील. पण आता या सरकारी निवासस्थानी लग्नाचे सनई चाैघडे वाजणार आहेत. विशेष म्हणजे ज्या जोडीचे हे लग्न होणार आहे, ते सरकारी निवासस्थानी लग्न करणारे पहिलेच जोडपे असणार आहे.

राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच एक महिला सीआरपीएफ अधिकारी विवाहबद्ध होणार आहे. राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. पूनम गुप्ता सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट आहे, व ती राष्ट्रपतींच्या सुरक्षेत तैनात आहे. येत्या १२ फेब्रुवारीला, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट अवनीश कुमारसोबत पूनमचे ​​लग्न होत आहे. या लग्नसोहळ्याला फक्त दोन्ही कुटुंबातील जवळचे लोकच उपस्थित राहणार आहेत. सीआरपीएफची महिला अधिकारी पूनम गुप्ता सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पीएसओ म्हणून तैनात आहे. पूनमचा स्वभाव आणि चांगल्या कामगिरीमुळे द्रौपदी मुर्मू तिच्यावर खूप खुश आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच हे लग्न राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसा क्राऊन परिसरात होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पूनम गुप्ताने २०२४ साली प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये सीआरपीएफच्या महिला तुकडीचे नेतृत्व केले होते. पूनमने पदवीचे शिक्षण घेत इंग्रजी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे. ती जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी होती. तिने २०१८ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत ८१ वी रँक मिळवून सीआरपीएफमध्ये असिस्टेंट कमांडेंट बनली. पूनम मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रहिवासी असून तिचे वडील रघुवीर गुप्ता हे नवोदय विद्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीही पूनमला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहू शकतात. सध्यातरी पूनम आणि त्यांचे कुटुंब या लग्नाबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. प्रोटोकॉलचा हवाला देत त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात अशाप्रकारचा लग्नसोहळा होणार असून या विवाहासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असणार आहे. पूनम गुप्ताचं लग्न ठरलंय हे समजल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच पूनमचं लग्न राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसा क्राऊन परिसरात करण्याची व्यवस्था केली आहे.