घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप १६ जणांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी मदत आणि बचावकार्य पूर्ण झाले. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिती दिली. त्याच वेळी या दुर्घटनेचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. केवळ १७ सेंकदाचा असलेला हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे द्दश्य त्या व्हिडिओतून दिसत आहे. आता या प्रकरणी चौकशी सुरु राहणार आहे. काही दिवस इतर बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई होत राहणार आहे. परंतु त्यानंतर पुन्हा सर्वसामन्यांना धोकादायक होर्डिंगचा सामना करावा लागणार आहे. कारण राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २०२२ मध्ये होर्डिंगसंदर्भात धोरण आणले. परंतु त्याचे कायद्यात रुपांतर झाले नाही. होर्डिंगबाबत कायदाच नसल्यामुळे धोरणांचा अंमलबजावणी कायद्याने सक्तीची नाही.
बचाव कार्य पूर्ण झालंय
घाटकोपर दुर्घटनेत NDRF, BPCL, MMRDA, अग्निशमन दल, BMC यंत्रणांचा बचाव कार्यात समावेश होता. या सर्वांनी समन्वय राखून बचावकार्य केल्याची माहिती मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. बचावकार्य पूर्ण झालंय. आता फक्त ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे मदत जाहीर झाली आहे.
मुंबईत अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरु
अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे काम कालपासून सुरू झाले असल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले. होर्डिंग लावण्याची जी मानांकन ठरवून दिली आहेत, त्या व्यतिरिक्त जर होर्डिंग असतील तर ती हटवली जात आहेत. होर्डिंगच्या मानकांमध्ये त्या होर्डिंगची साईज, त्याचे फाउंडेशन, त्याचा आकार, होर्डिंगमधून पास होणारी हवा, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ही मानके ठरवली आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत होर्डिंग कोसळतानाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ