
संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात भारतीय संविधानाचे धडे गिरविले व संवैधानिक मूल्य कृतीमध्ये आणले त्याच महाविद्यालयात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही अत्यंत महत्त्वाची व समाधानाची बाब आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात या पार्कची कार्यपूर्ती होऊन जनतेसाठी खुला होत आहे ही त्यातही महत्त्वाची बाब आहे. भारतीय संविधानाने सक्षम लोकशाहीची रचना करुन येथील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार, समान संधीचा अधिकार व न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे. यामुळेच संविधानातील मूल्यांवर चालत भारताने जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळविला आहे. संपूर्ण संविधान प्रास्ताविका पार्क हा दोन एकर परिसरात ९.५ कोटी रुपये खर्चातून निर्माण करण्यात आला आहे.
उद्देशिका संविधानाचा गाभा आहे. यातील निहीत मूल्यांचा सर्व नागरिकांनी अंगिकार करण्याची गरज आहे व संविधान उद्देशिका पार्कच्या माध्यमातून याची प्रेरणा येथे भेट देण्याऱ्या प्रत्येकाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येईल तसेच संविधान उद्देशिका पार्कला आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.









