राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय झालेला दिसत नाही. मागील काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची सातत्याने चर्चा रंगताना दिसली. शेवटी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदापासून माघार घेण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे नवीन मुख्यमंत्री असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.
त्यामुळे आता मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना मिळाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे नेमकी कोणती खाते दिली जातील, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपाला सर्वाधिक मंत्रिपदे मिळणार आहेत. भाजप पुन्हा एकदा गृहखाते आपल्याकडेच ठेवणार आहे. शिंदे मुख्यमंत्री असतानाही गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होते. तर आता नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते राहण्याची शक्यता आहे. सरकारमधील अनुभवाचा विचार केल्यास अजित पवार हे अनुभवाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. तसेच अजित पवार हे पाचवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत महायुतीच्या सरकारमध्ये वित्त मंत्रालय हे अजित पवार यांना दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्यासोबत राज्यातील मंत्रिमंडळावर चर्चा होणार आहे. महायुतीमधील वाटाघाटी दिल्लीमध्ये लवकरच ठरल्या जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज महायुतीचा मुख्यमंत्री कोण, याचा फैसला करण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.