टोमॅटो फेकून देण्याची शेतकऱ्यावर आली वेळ…बघा नेमकं घडलय काय ?

लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने माल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. चांगल्या प्रतिच्या टोमॅटोच्या तीस किलोच्या कॅरेटला शंभर ते दिडशे रुपये बाजारभाव मिळत असल्याने उत्पान खर्च तर बाजुलाच परंतु तोडणी आणि वाहतूक खर्चच भागत नसल्याने बळीराजा हैराण झाला आहे.दोन नं व बारीक व उन्हामुळे पिवळा पडलेल्या मालाला ग्राहकच नसल्याने पन्नास ते साठ रुपयांना तीस किलो वजनाचे कॅरेट द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना न खपलेला माल मार्केट मधून माघारी नेण्याची नामुष्की ओढवली आहे.

काही शेतकऱ्यांनी माल परत नेण्यापेक्षा बाजारातच ओतून देऊन रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.तोडणी खर्च,मोटार भाडे,शेतकऱ्यांचा येण्या जाण्याचा खर्च,याची पदरमोड करण्याची वेळ शेतटऱ्यांवर आली आहे.मोरगाव सुपे येथील शेतकरी रामभाऊ गडदे यांनी सांगितले की टोमॅटो पिकासाठी तीन ते चार महिने पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या पिकाला केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा विचार केला तर खर्च वसुल होणे बाजूलाच कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तरी शासनाने सहानभुतीपुर्वक विचार करून उत्पादन खर्चावर हमीभाव देण्याची गरज असल्याची भावना बळीराजा व्यक्त करत आहे.