राज्याला पाऊस झोडपणार, हवामान विभागाचा इशारा

राज्यातील जिल्ह्यांना अलर्ट जारी, या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, एनडीआरएफ सतर्क, गरज असेल तरच बाहेर पडा

मुंबई – राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. IMD ने कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आपत्ती निवारण कक्षालाही सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल. ढगाळ हवामान राहणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही भागांत चक्री वारेही वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार आहे. विशेषत: नागपूर व गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. चंद्रपूर व अमरावतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर आणि सांगलीत पावसाची उघडीप सुरू आहे. पुण्यात सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे, रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस आहे, पावसामुळे वाहतूक मंदावली आहे, मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले आहेत, धरणातून ५ हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आलं आहे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्ह्यातील माणगाव, तळा, रोहा, पाली, महाड आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना पावसामुळे काही भागातील नद्यांना पूर आले असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.