तुतारीचा आवाज घुमला, शिरूरमधून अमोल कोल्हे हे आघाडीवर, महाराष्ट्रात दोन जागांवर आघाडी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे, सुरुवातीलाच मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटानं दोन जागांवर आघाडी घेतली आहे. बारामतीमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत तर शिरूरमधून अमोल कोल्हे हे आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये अटितटीची निवडणूक झाली होती. पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आले. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सुप्रिया सुळे सध्या बारामतीमधून आघाडीवर आहेत.

तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची बनवली होती, आढाळराव पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत शिरूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवण्यात आलं. या मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे.

दरम्यान जवळपास अडीच महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होणार आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपने यावेळी ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला आहे. पण एक्झिट पोलमध्ये एनडीएला 350 ते 380 पर्यंत जागांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजप खरंच 400 पार करेल का हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने विरोधी पक्षांची मोट बांधत इंडिया आघाडीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे काँग्रेस यावेळी मोदींचा रथ रोखणार का, लोक इंडिया आघाडीला स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.